नाशिक (प्रतिनिधी): कामधंदा न करता रोज दारूसाठी पैसे मागून कुटुंबियांनाच शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या मुलाला पिता आणि त्याच्या भाच्याने (बहिणीच्या मुलाने) बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
बिटको रुग्णालयासमोर बेवारस मृतदेह सापडल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर नाशिकरोड येथील खर्जुल मळ्यात पित्यानेच मुलाचा खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मृताचा भाचा आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी पित्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
मूळचे मालेगाव येथील असलेले सूर्यवंशी कुटुंब नाशिकरोडच्या खर्जुल मळ्यात राहते. त्यांचा मुलगा सुनील नानाजी सूर्यवंशी (३३) याचा मृतदेह बुधवारी (दि. २५) सकाळी बिटको रुग्णालयाजवळ बेवारस आढळला होता. पहाटे काही नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पुढे शवविच्छेदनासाठी हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्यावर त्यावेळी त्याच्या शरीरावर काठीने मारल्याच्या जखमा दिसून आल्या.
त्यानंतर त्याचा खूनच झाल्याचे उघडकीस आले. पोलिस तपासात सुनील सूर्यवंशी याला दारूचे व्यसन असून तो नशेत आई, वडिलांना शिवीगाळ, मारहाण करत असल्याचे उघडकीस आले. अशातच मंगळवारी (दि. २४) रात्री उशिरा वडील नानाजी सूर्यवंशी (६३) व त्यांचा नातू सुनीलच्या बहिणीचा मुलगा गणेश जाधव (२५, रा. खर्जुल मळा) यांनी त्यास बेदम मारहाण करून बिटको रुग्णालयासमोर टाकले. सुनीलच्या पित्यासह भाच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा उघडकीस आला प्रकार:
याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृताचे नाव मिळाल्यावर खर्जुल मळा परिसरातील रहिवाशांकडे चौकशी केली असता सुनील सूर्यवंशी याने त्याचे वडील, आई व घराच्या वरती राहणाऱ्या भाच्याला शिवीगाळ देते मारहाण केले अशी माहिती हाती मिळाली. वडिलांची दोन ते अडीच तास चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.