नाशिक (प्रतिनिधी): शहरासह जिल्ह्यातील घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. गुरुवारपासून (दि.२६) पुढे तीन दिवस नाशिककरिता ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिकचे वातावरण बदलले असून, सूर्यदर्शन नागरिकांना दुर्लभ झाले आहे.
शहराच्या हवामानात वेगाने बदल झाला असून, थंडी गायब झाली असली तरी पहाटे व सायंकाळच्या सुमारास काही प्रमाणात बोचरे वारे वाहत असल्याने वातावरणात नाशिककरांना गारवाही जाणवत आहे. सकाळी शहरावर धुके पसरत असल्याचेही चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. मंगळवारी (दि.२४) सकाळी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तसेच वातावरणात आर्द्रता ९६ टक्क्यांपर्यंत मोजण्यात आली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकाळी दाट धुके पसरलेले पाहावयास मिळाले. यामुळे दृश्यमानतादेखील कमी झाली होती.
अरबी समुद्रात दीड किमी उंचीपर्यंत असलेल्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्याद्वारे संपूर्ण कोकणासह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अरबी समुद्रातून आर्द्रता वेगाने लोटली जात आहे. परिणामी, नाशिकसह १९ जिल्ह्यांत २४ तारखेपर्यंत सकाळी दाट, तर कधी विरळ धुक्याची चादर पसरलेली पाहावयास मिळत आहे.
![]()


