नाशिक (प्रतिनिधी): शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचा बेशिस्तपणा हा दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. यानुसार शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि स्थानिक पोलिस ठाण्यांचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे.
बुधवारी (दि.१८) मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४६० बेशिस्त वाहनचालकांना दंडाचा दणका देण्यात आला. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्ते सुरक्षा अधिकाधिक जोपासण्यास मदत होईल आणि शहरांतर्गत रस्त्यांवरील अपघाताच्या घटना कमी होतील, या उद्देशाने पुन्हा एकदा पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी या मोहिमेबाबत सहायक पोलिस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्यासह चारही युनिटच्या प्रभारी निरीक्षकांची बैठक घेतली. तसेच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव यांनीही दोन्ही परिमंडळांतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यांच्या प्रभारी निरीक्षकांना या मोहिमेत सहभागी होण्याची सूचना केली. तसेच आरटीओचेही अधिकारी, कर्मचारी यांनीही पोलिसांसोबत या मोहिमेत सहभाग घेतला आहे.
बुधवारी शहरातील विविध भागांमध्ये अचानकपणे मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची भंबेरी उडाली. ही मोहीम पुढील आदेशापर्यंत सुरूच राहणार असल्याचे खांडवी यांनी सांगितले.
वाहतूक नियमांचे पालन कराच:
सिग्नल उल्लंघन, विरुद्ध दिशेने वाहतूक, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट वाहतूक, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, मोटारींच्या काचांवर काळ्या फिल्म चढविणे, नो-एन्ट्रीमध्ये प्रवेश करणे, मोबाइलचा वापर, झेब्रा क्रॉसिंग व अन्य अशा विविध वाहतूक नियमांतर्गत वाहनचालकांवर बेशिस्त वाहतूकप्रकरणी मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
![]()


