नाशिक (प्रतिनिधी): उत्तरेकडील थंडी वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्याने थंडीची लाट टिकून आहे. अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी कायम आहे. मंगळवारी (ता.17) धुळे येथील कृषी महाविद्यालयात सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे हंगामातील नीचांकी 4 अंश तापमान नोंदले गेले.
मात्र, गुरुवारनंतर पारा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 10 दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे.
राज्यातही थंडीची तीव्रता वाढली असून, किमान तापमान 10 अंशांच्या खाली येत, सरासरी तापमानात 4.5 अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने धुळे, परभणी (कृषी), जेऊर, अहिल्यानगर, निफाड, नांदेड येथे थंडीची लाट आली आहे. नाशिकसह मालेगाव, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, गोंदिया, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, भंडारा येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्याने गारठा कायम आहे.
मात्र नाताळला थंडी कमी होणार आहे. वर्षाअखेरीस म्हणजे 29 डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षात पुन्हा थंडीची वाढण्याची शक्यता आहे . नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती पुढील एक-दोन दिवसांत तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये रत्नागिरीत राज्यातील उच्चांकी 33.5 अंश तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्रावर येऊन धडकत असल्याने राज्यात रात्रंदिवस गारठा जाणवत आहे. आज (ता. १८) राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मराठवाड्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद परभणी आणि बीडमध्ये झाली आहे. त्यानतंर नांदेड आणि धाराशिव 10 अंश सेल्सिअस तर हिंगोली आणि लातूरमध्ये आज 12 अंश सेल्सिअस तापमान राहील. तसेच सकाळी धुक्याची तीव्रता अधिक राहील आणि दिवसभर हवामान कोरडे राहील.
![]()


