नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास व्हावा- डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करताना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून नियोजन करावे आणि त्यासाठी रेल्वे विभाग आणि राज्य शासनाच्या विविध यंत्रणानी समन्वय साधून काम करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी केली.

नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील सभागृहात गुरुवारी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम आणि मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांनी रेल्वे स्टेशन पुनर्विकास अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सिटी लिंक परिवहन सेवा यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास करताना लागूनच असलेल्या एसटी महामंडळ, आणि सिटी लिंकच्या बस स्थानकाचाही सोबतच विकास व्हावा व एकंदरीत निर्माण होणारी सुविधा ही एसटी बस, सिटी बस आणि रेल्वे यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सिमलेस कनेक्टीव्हीटी व्हावी आणि नागरिकांना कमीतकमी चालावे लागेल या पध्दतीने पुनर्विकास करण्याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली.

यावेळी बोलताना डॉ. गेडाम म्हणाले की, नाशिक रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करताना परिवहन आणि दळणवळण सेवेचा एकत्रित नियोजनाच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक नाशिक शहरात त्यावेळी येतील. त्यांची वाहतुकीची सोय आणि त्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने वाहतूक सेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सिटी लिंक परिवहन सेवा या यंत्रणांशी समन्वय ठेवून विकास कामे करणे अपेक्षित आहे. सर्व यंत्रणांच्या परस्पर समन्वयाने येथे येणाऱ्या भाविकांसाठी आपण सुलभ आणि दर्जेदार दळणवळण सुविधा उपलब्ध करून देऊ शकणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.

 नाशिक रोड रेल्वे स्टेशन वर येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या, येथील उपलब्ध फलाटांची संख्या, येथे येणाऱ्या संभाव्य भाविकांची संख्या याचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे. मागील कुंभमेळ्या वेळी केली गेलेली व्यवस्था आणि त्या मध्ये आता करण्यात येणारी वाढ यात आमूलाग्र बदल असणार आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांची तयारी असणे आवश्यक आहे.  नाशिक येथे कुंभमेळा आणि विशेषतः त्यातील पर्वणीच्या दिवशी (शाही स्नान) लाखो भाविक शहरात दाखल होतात. त्यांना रामकुंड पर्यंत सहजतेने पोहोचता यावे, यासाठी वाहतूक व्यवस्था नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. रेल्वेच्या पुनर्विकास संदर्भात काही अडचणी असतील तर संबंधित राज्य शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्या सोडविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790