नाशिक (प्रतिनिधी): रात्री व मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीने नाशिक रोड परिसरात फिरून पादचाऱ्यांना एकाकी गाठून लुटमार करत मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करणाऱ्या तिघा चोरांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महेश ओमकार पुजारी (वय १९), करण रमेश डावर (१९, दोघे रा. जेतवननगर), पृथ्वी नीलेश भालेराव (२०, रा. राजवाडा) अशी चोरांची नावे आहेत. फिर्यादी किरण देशमुख (३२, रा. ता. अकोले) हे नाशिकरोड बसस्थानकाकडून दत्तमंदिर सिग्नलच्या दिशेने मध्यरात्री पायी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या पाठीमागून येत वाट रोखून देशमुख दमदाटी व मारहाण करीत त्यांच्याकडील ८२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, मोबाइल व महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून नेली होती.
या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने विहितगाव येथील वालदेवी नदीच्या पुलाजवळ सापळा रचून तिघांना पकडले.