नाशिक: आता मार्चअखेरपर्यंत सुट्टीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू

नाशिक (प्रतिनिधी): घरपट्टीचे २५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून आता मुख्यालयातील करभरणा केंद्रासह विभागीय कार्यालयातील करभरणा केंद्र आणि नागरी सुविधा केंद्र आता शनिवार, रविवार या सुट्टीच्या तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील सुरू राहणार आहेत. ३० नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीपर्यंत ही सुविधा असेल.

महापालिकेला घरपट्टी हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. जास्तीत जास्त व आगाऊ घरपट्टी वसूल व्हावी यासाठी महापालिकेने एप्रिल ते जून या कालावधीमध्ये करसवलत योजना आणली होती. योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने २७ सप्टेंबर २०२४ रोजी ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत अभय योजना जाहीर करत दंडामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून दोन महिन्यात शहरातील २७ हजार ७१७ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेत मनपाच्या तिजोरीत २४ कोटी ४० लाखांचा थकीत कर जमा केला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ; शेल्टर २०२४ चे उद्घाटन

त्याबदल्यात संबंधीत मालमत्ताधारकांना १२ कोटी ५१ लाखांची सवलत मिळाली आहे. करसवलत योजना जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर पुढील दोन महिने आर्थिक वर्षाचे अखेरचे असणार असल्यामुळे शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व विभागांतील भरणा केंद्र, नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

करवसुलीसाठी अॅक्शन प्लॅन:
अभय सवलत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच उद्दिष्टपूर्ती करण्याच्या दृष्टीने नोटिसा वाटप करणे, तगादे करणे, प्रबोधन करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडे आहे. या सर्वांवर दैनंदिन नियंत्रण असेल. करभरणा केंद्रात नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी तसेच वसुली कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवसाची पर्यायी सुट्टी देण्याबाबत विभागीय अधिकारी बायोमेट्रिक हजेरीची तपासूणी करून निर्णय घेणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790