नाशिक (प्रतिनिधी): शहरवासिय पुन्हा थंडीने गारठले असून शनिवारी (दि. ३० नोव्हेंबर २०२४) किमान तापमानाचा पारा ८.९ पर्यंत घसरला होता. तापमानात दररोज घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत थंडीची लाट राहील, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून हवामान विभागाच्या अंदाजानुसार देण्यात आला होता.
उत्तर भारतातून वाहणारे थंड वारे राज्यात प्रवेश करताना दीड किमी उंचीपर्यंत सुमारे २५ ते ३० किमी वेगाने पूर्वीय दिशेच्या वाऱ्यात मिसळून राज्यभर लोटले जात आहे.
यामुळे थंडीची तीव्रता वाढण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. उत्तर भारतातील राज्यांमधील समुद्रसपाटीपासून साडेबारा किमी उंचीवर सातत्याने टिकून असलेले वारे ताशी २७५ किमी गतीने वेगवान झोत वायव्य आशियातून राज्यात मार्गक्रमण करत आहेत. यामुळे वारावहनातून राज्यात १ डिसेंबरपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यताही हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी वर्तविली आहे.
![]()


