नाशिक (प्रतिनिधी): तीन दिवसांपूर्वी झालेल्या लहान मुलांच्या वादातून एका युवकास काही महिला व मुलांनी मारहाण करत त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने पोटावर व डोक्यात टणक वस्तूने जोरदार प्रहार करत त्यास ठार मारल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास विडी कामगार नगरात घडली.
विशांत भोये (२९) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे आडगाव पोलिसांनी सांगितले. आडगाव शिवारातील अमृतधाम विडीकामगार नगर मध्ये विशांत उर्फ काळू हा राहत होता. तो रात्री परिसरात मित्रांसमवेत गप्पा मारत असताना त्या ठिकाणी काही महिला पुरुष व मुले आली. त्यांनी तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या लहान मुलांच्या वादातून कुरापत काढून भोये यास शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. काही महिलांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. यानंतर टोळक्याने त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला.
घाव वर्मी लागल्याने भोये रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशीरा ही घटना घडली. रक्तबंबाळ अवस्थेत विशांतला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील भाऊ असा परिवार आहे.
मयत भोये यांच्या नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करत जोपर्यंत संशयित महिला व पुरुष आरोपींना पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचरण केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह शोध पथकाचे पोलीस पथक दाखल झाले होते.
![]()


