
नाशिक (प्रतिनिधी): देवळाली कँम्प आणि उपनगर भागात मागील दोन दिवसांत जबरी लूट करुन आय ट्वेंटी कारमधून फिरुन सामान्यांच्या मनात धडकी भरविणाऱ्या आठ दरोडेखोरांची ओळख पटली आहे. त्यातील तिघांना उपनगर पोलिसांना अलर्ट कॉल मिळताच पाठलाग करुन पकडले असून इतर इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
तिघांकडून गावठी कट्टा व दरोडा टाकण्यासाठी लागणारे घातक शस्त्रास्रे, दोरीरी व मिरचीपूड जप्त केली आहे. त्यामुळे आता जबरी लूट व दरोड्याचे आणखी गुन्हे उघड होणार आहेत. अटकेतील सराईतांसह पळून गेलेले काही संशयित तडिपार व खंडणीखोर आहेत.
स्वप्निल उर्फ भूषण सुनिल गोसावी, दानिश हबीब शेख, बबलु रामधर यादव (वय २१, रा. सुंदरनगर), सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सुरज भालेराव, अनिकेत उर्फ शबऱ्या देवरे, रोहीत लोंढे उर्फ भुऱ्या अशी संशयित दरोडेखोरांची नावे असून गोसावी, शेख व यादव यांना अटक करण्यात आली आहे. सचदेव (७०, रा. देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, ते शुक्रवारी (दि.२२) रात्री सव्वा नऊ वाजता देवळाली कँम्प भागातील भैरवनाथ मंदिरासमोरील दुकान बंद करून आयट्वेंटी कारमधून घरी जात होते. त्यावेळी दुसऱ्या आयट्वेंटी कारमधून आलेल आलेल्या वरील संशयितांनी कुरापत काढून थेट हातात हातोडी, गावठी कट्टा घेऊन सचदेव यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या.
तसेच कारमधील २५ हजार रुपयांची रोकड जबरीने लुटली. यात कारच्या काचा फुटल्याने सचदेव यांच्या हातास, चेहऱ्यास दुखापत झाली. यानंतर देवळाली कँम्प पोलिसांत संशयितांवर जबरी लुटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर या टोळक्याचा शोधसुरु असतानाच, त्यांनी उपनगर परिसरात दहशत माजविली.
अवघ्या तासाभरात हेच संशयित रात्री साडेदहा वाजता देवळाली गावातील जाधव मळा परिसरात असलेल्या सुवर्ण सोसायटीत शिरले. त्यांनी आदित्य किशोर आवारे व त्यांचे मित्र कृष्णा साकला, संतोष पगारे व शुभम जाधव हे ऑफिसमध्ये गप्पा मारत असतानाच त्यांना नाहक शिवीगाळ करून कट्टा व हत्यारांचा धाक दाखवून आवारेच्या खिश्यातील पाच हजार रुपये काढून तिघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. ऑफिसच्या काचा व सीसीटीव्ही कॅमेरे फोडुन पळून गेले.
दरम्यान, याबाबत उपनगर जबरी लूटीचा गुन्हा नोंद आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी व उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सूचनेने ही कारवाई सहायक निरीक्षक सुयोग वायकर व पथकाने केली.
![]()


