
नाशिक: पूर्व मतदारसंघातील महायुती व भाजपचे उमेदवार आ. अॅड. राहुल ढिकले यांनी जेलरोड परिसरात निर्माण केलेल्या प्रचाराच्या वादळाने आणि त्यांच्या आक्रमक शैलीने विरोधकांना धडकी भरली आहे.
प्रचार सभेला मतदारांची झालेली गर्दी ढिकलेंच्या विजयाची नांदी ठरली आहे. यावेळी त्यांनी जेलरोडकरांवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशारा दिला. नरहरीनगरातील प्रचार सभेत जेलरोड परिसरात श्री संत ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिकरोड विभागाचे माजी सभापती विशाल संगमनेरे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, शरद मोरे, सचिन हांडगे, मीराबाई हांडगे, सुरेखा निमसे, कुंदा शहाणे आदी उपस्थित होते. यावेळी ढिकले म्हणाले की, दादागिरी करणाऱ्यांनो सावधान, दारूच्या दलालांनो जर तुम्ही जनतेला त्रास दिला तर तुमचा सामना माझ्याशी आहे. मी फक्त वकील नाही तर पहिलवानही आहे. कायद्याची ताकद व शरीराची बळकटी दोन्ही माझ्याकडे आहेत. हिंमत असेल तर समोर या, अशा शब्दांत ढिकलेंनी विरोधकांना आव्हान दिले.
जेलरोडवासीयांवरील अन्याय सहन करणार नाही. जनता जागी झाली आहे. आता कुणालाही जनतेच्या भावनांशी खेळू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सोनार समाजाला उद्देशून ते म्हणाले की, तुम्हाला खऱ्या सोन्याची पारख आहे. ज्यांनी प्रचार कार्यालयातच मद्य दुकाने उघडली अशा बेजबाबदार लोकांना तुम्ही नक्कीच धडा शिकवाल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
![]()


