नाशिक (प्रतिनिधी): जन्मदात्या आईच्या प्रोत्साहनातून आठवर्षीय मुलीचा विनयभंग आजोबा, सावत्र पित्याने केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेत संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडून कसून तपास केला जातो आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पीडित मुलीच्या आईसह तिचा दुसरा पती आणि सासऱ्याविरुद्ध पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, घटस्फोटानंतर आठवर्षीय मुलीचा ताबा तिच्या आईकडे होता. यादरम्यान आईने दुसरे लग्न केले. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान सोबत राहात असलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या आईने सावत्र आजोबांजवळ झोपण्यासाठी जबरदस्ती केली. आजोबांनी त्यांच्याजवळ वारंवार ओढत असल्याचे प्रकार घडत असल्याने, मुलीने त्यांच्याजवळ झोपण्यास नकार दिला. मात्र आईने दमदाटी करत आग्रह धरला. तसेच पीडितेच्या सावत्र पित्यानेही अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
दिवाळीनिमित्त पीडित मुलगी वडिलांकडे आली होती. त्यावेळी तिने हा संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर संतप्त पित्याने पोलिस ठाणे गाठत संशयितांविरुद्ध फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. मुलगी तसेच तिच्या आई, वडिलांचा जबाब घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
![]()


