नाशिक (प्रतिनिधी): फायनान्स कंपनीकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकास कमिशनपोटी ७० लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कोळपकर (वय ६०, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती. त्यावेळी संशयित आरोपी सप्तश्री क्रेस्ट एलएलपी फर्मचे सदस्य संदीप मेनन, वरुण संदीप मेनन व वैभव मांजरेकर (तिघेही रा. वडवली, मुंबई) यांनी फिर्यादी कोळपकर यांच्याशी संपर्क साधला व प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर कर्ज मंजूर करण्यासाठी कमिशन म्हणून ७० लाख रुपयांची मागणी तीनही आरोपींनी कोळपकर यांच्याकडे केली. त्यानुसार कोळपकर यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत एच. डी. एफ. सी. बँकेच्या शरणपूर रोड शाखेतील बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे १५ लाख रुपये, तसेच सप्तश्री एलएलपीचे कार्यालय, ठाणे, तसेच नाशिक सीबीएस येथील कार्यालयात ५५ लाख रुपये रोख स्वरूपात कमिशन म्हणून दिले.
पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर होईल, या आशेने फिर्यादी यांनी आरोपींना ७० लाख रुपये दिले; मात्र ही रक्कम स्वीकारूनही आरोपींनी कर्ज मंजूर करून न देता कोळपकर यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संदीप मेनन, वरुण मेनन व वैभव मांजरेकर या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २६७/२०२४)