नाशिक: नाशिक शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपेरेशन; २०६ गुन्हेगारांची तपासणी ! पिस्तूल, कोयता बाळगणाऱ्यांना बेड्या

नाशिक (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगली जात आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ- २मधील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी २०६ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यावेळी गावठी पिस्तूल, कोयता बाळगणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

विधानसभा निवडणूक काळात शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. देवळाली कॅम्प, नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड, सातपूर, चुंचाळे पोलिस चौकीच्या हद्दीत पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. वरील पोलिस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षकांसह अंमलदारांनी सहभाग घेतला.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

यावेळी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार संशयित इंद्रजित राजू वाघ याला शिखरेवाडी मैदानाजवळ ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आढळले. त्याच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयित राम बाळू पवार (रा. सिन्नरफाटा) याच्याकडे धारदार कोयता सापडला. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

दोन तडीपार गुंड ताब्यात:
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी उमेश अशोक गायधनी (२९, रा. पळसे गाव) व नितीन निवृत्ती बनकर (रा. रोकडोबावाडी) या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिस उपायुक्तांनी तडीपार केले होते. तरीदेखील हे दोघेही विनापरवानगी परिसरात वावरताना सापडले. पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याविरुद्ध नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790