नाशिक (प्रतिनिधी): बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून लंपास केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी पल्लवी किशोर पवार (रा. ऋषिराज मोनार्क अपार्टमेंट, नवशा गणपतीजवळ, गंगापूर रोड, नाशिक) या काही कामानिमित्त १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान बाहेरगावी होत्या. यादरम्यान चोरट्यांनी घरात शिरून ८० हजार रुपये किंमतीची ११ ग्रॅम वजनाचे २ कानातले जोड, १८ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे मोती असलेले पँडल, २४ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची गोळी, ७० हजार रुपये किंमतीचे ८५ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन, ३५ ग्रॅम वजनाचे अॅक्लेट, ३५ ग्रॅम वजनाचा चांदीचा करंडा, ५० ग्रॅम वजनाचा चांदीचा छल्ला, ५ ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, ३० ग्रॅम वजनाची अत्तरदानी, ७० हजार रुपये रोख व काही परदेशी चलन असा एकूण २ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे समजले.
पवार यांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव करीत आहे.