नाशिक (प्रतिनिधी): सराफ व्यावसायिकाने एका सेवानिवृत्त पोलीस अधिका-यास सव्वा पंधरा लाख रूपयाला गंडा घातला. सोने खरेदी विक्री व्यवहारात ही फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सतिश कांतीलाल बेदमुथा (रा.सराफ बाजार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सराफाचे नाव असून याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन नारायण देशमुख (रा.आनंदवली) यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख यांच्या मुलीचा विवाह असल्याने त्यांनी गेल्या वर्षी सराफ बाजारातील अभिनंदन ज्वेलर्स तथा कांतीलाल सुगनचंद सराफचे संचालक बेदमुथा यांची भेट घेतली होती.
२१ व २८ जून आणि २ जुलै रोजी घरातील २११.१६ ग्रॅम वजनाचे शुध्द सोन्याचे अलंकार विश्वासाने नवीन दागिणे घडवणीसाठी संशयिताच्या स्वाधिन करण्यात आल होते. मात्र संशयिताने दागिणे ऑर्डर प्रमाणे दिले नाही. लग्नाच्या ऐनवेळी सहा बांगड्या देण्यात आल्या मात्र त्याही खोट्या सोन्याच्या असल्याचे समोर आले. विश्वास घात झाल्याचे निदर्शनास आल्याने देशमुख यांनी पोलीसात धाव घेतली असून या घटनेत त्यांची १५ लाख १४ हजार २९१ रूपयांची फसवणुक झाल्याचा आरोप केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २६०/२०२४)