नाशिक (प्रतिनिधी): हाताला लागले असल्यामुळे कपडे धुण्यास नकार दिला म्हणून विवाहितेला मारहाण करून विष पाजण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. याप्रकरणी पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास देवळाली गाव येथील जगताप मळा परिसरात सासरी नांदत होती. त्यावेळी तिची नणंद चार-पाच गोण्या भरून कपडे धुण्यासाठी घेऊन आली व जेवण करून ती निघून गेली.
हे कपडे तिच्या सासूने भिजविले व विवाहितेला ते कपडे धुण्यास सांगितले; मात्र विवाहितेच्या हाताला लागलेले असल्यामुळे तिने कपडे धुऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सासूने तिच्याशी भांडण केले, तसेच ही बाब सासूने तिच्या पतीला सांगितल्यानंतर त्यानेही तिला शिवीगाळ केली. त्यानंतर पती व सासूने मिळून विवाहितेला मारहाण केली, तसेच घराबाहेर काढले. त्यानंतर सासू व पतीने विवाहितेला बळजबरीने विषारी औषध पाजले. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या पतीने औषधोपचारासाठी जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.