नाशिक (प्रतिनिधी): सायबर भामटे ऑनलाईन फ्रॉड करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करीत असून शहरातील एकाच्या आधारकार्डचा वापर करून कुरिअर पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचा बनावट कॉल मुंबई सायबर सेल व गुन्हेशाखेतून केला. एवढेच नव्हे तर, तुमच्या घरासह कुटूंबियावर सीबीआयची पाळत असून, याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडण्यास मज्जाव तर केलाच शिवाय, कोणालाही संपर्क साधण्यास मनाई करीत एकप्रकारे ‘हाऊस अरेस्ट’चा फंडा वापरून त्यांच्याकडून बळजबरीने साडेतीन लाखांची रक्कम ऑनलाईन टाकण्यास भाग पाडत सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, २५ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर व्हॉटसॲप कॉल आला. संशयित सायबर भामट्याने करिअर कंपनी व मुंबई सायबर सेल, गुन्हेशाखेतून पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. संशयितांनी २०० ग्रॅम ड्रग्ज, पाच पासपोर्ट, ३ एटीएम कार्ड तुमच्या कुरिअरमध्ये सापडले असून तक्रारदाराच्या आधारकार्डचा वापर करीत अज्ञात संशयितांनी मुंबई तीन बनावट बँक खाते उघडल्याचे सांगितले.
यातून मनी लॉण्डरिंग झाल्याचे सांगत अटक वारंट काढले आहे. त्या खोट्या अटक वॉरंटचा फोटो संशयितांनी तक्रारदारास व्हॉटसॲप केला. तसेच तक्रारदाराच्या घराबाहेर सीबीआयचे अधिकारी पाळत ठेवून आहेत. कुटूंबियांच्या जीवाला धोका असून, घराबाहेर पडायचे नाही, कोणाशीही संपर्क साधू नये. तसेच, दरतासाला घरातून मेसेज करण्यास सांगत त्यांना एकप्रकारे हाऊस अरेस्ट केले.
चौकशी करण्यासाठी बँक खात्याची तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडून युपीआयडीवरून ३ लाख ३६ हजार ७९३ रुपये ऑनलाईन टाकण्यास भाग पाडून खंडणी उकळली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने शहर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे हे तपास करीत आहेत.