नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर परिसरातून महागड्या कार चोरून त्यांची तामीळनाडू, कर्नाटकात विक्री करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात शहर गुन्हेशाखेला यश आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या मोटार सायकल चोरी शोध पथकाने एकाला शिरुर (पुणे) येथून अट केली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
शेख नदीम शेख दाऊत (३२, रा. धाड, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, किशोर पवार, विशाल जाधव, डेवीड यांचा पोलीस शोध घेत आहेत. शहर परिसरातून दुचाक्यांसह महागड्या कार चोरीला जाण्याचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या मोटार सायकल चोरी शोध पथक करीत होते. या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पथकाचे उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, भगवान जाधव हे बुलढाण्यासह परजिल्ह्यात संशयितांचा शोध घेण्यासाठी गेले होते.
यातून संशयित नदीम हा कारचोरीचा आंतरराज्य टोळीचा मुख्य संशयित असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेत असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने नदीम या शिरूर येथून अटक करण्यात आली. त्याने संशयित पवार व जाधव यांच्या मदतीने नाशिकसह परजिल्ह्यातील कार चोरी करून त्या तामीळनाडू, कर्नाटक राज्यात विक्री केल्याचे कबुली दिली. नाशिकमधील कार त्याने तामीळनाडूत संशयित डेविड यास विक्री केल्या असून या तीनही संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. संशयित नदीम याच्याकडून मुंबई नाका व उपनगर हद्दीतील चोरलेल्या कारचे गुन्ह्यांची उकल झाली आहे.