नाशिक (प्रतिनिधी): दर महिन्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागत दुकानदारास कोयता दाखवून दमदाटी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी गोपाल ईश्वरदास किशनानी (रा. कोमल अपार्टमेंट, जेलरोड, नाशिकरोड) यांचे नाशिकरोडला सुभाष रोड परिसरात के. बी. एन. मार्केटमध्ये राजधानी जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. फिर्यादी किशनानी हे दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकानात असताना आरोपी सनी श्याम भाटिया (रा. गुलजारवाडी, नाशिकरोड) हा तेथे आला व दुकानदारास म्हणाला, की “मेरे को हर महिने पाच हजार रुपये की खंडणी दे.” त्यावर किशनानी यांनी “मी तुला पैसे देऊ शकत नाही. तुला दरमहा पाच हजार का द्यायचे?” असे म्हटले.
त्यावर संशयित आरोपी सनी भाटिया याने त्याच्याजवळ असलेला कोयता काढून किशनानी यांना दाखविला व “तूने अगर मुझे पैसे नही दिये, तो मैं तुझे मार डालूँगा,” असे म्हणून दुकानमालकास वाईटसाईट शिवीगाळ करीत दमदाटी केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सनी भाटियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देवरे करीत आहेत. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५१७/२०२४)