नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोडच्या दत्त मंदिर सिग्नल चौकातून रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला मदतीचा बनाव करत दोघा महिला चोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीला ब्लेड मारून अडीच हजारांची रोकड व सोन्याची पोत असलेली मिनी पर्स काढून घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ११) भरदुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.
जेलरोड पवारवाडीजवळील प्रगती नगर येथील शिवचित्र सदन येथे राहणाऱ्या वयोवृद्ध चतुरा सदाशिव भिसे या बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बिटको चौकाजवळील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. यावेळी दोन अज्ञात महिलांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्या महिला चोरांनी माणुसकीचा आव आणत रस्ता ओलांडण्यासाठी भिसे यांना मदतीचा बनाव करून त्यांच्याकडील २२ ग्रॅम वजनाची ओम पान असलेली सोन्याची चेन, रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली मिनी पर्स चोरली.
यावेळी भिसे यांच्याजवळील कापडी पिशवी रस्त्यावर खाली पडली असता, त्यांनी ती उचलून तपासली. यावेळी त्या कापडी पिशवीला बाजूने ब्लेड मारून त्यातील मिनी पर्समध्ये असलेली ६६ हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पंचवीसशे रुपये रोख व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, त्या दोन्ही महिला रिक्षामध्ये बसून निघून गेल्या. या प्रकरणी उपनगर पोलिस पुढील तपास करत आहेत. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३०९/२०२४)