नाशिक (प्रतिनिधी): शहरातील कथित गुंड बसक्या डॉन याने त्याच्या समर्थकांसह सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापत त्याचा रिल सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. सायबर पोलिसांना पेट्रोलिंगमध्ये ही माहिती मिळताच, रिल बघून त्यांनी बसक्या डॉनला शोधत ताब्यात घेतले. त्याच रिलवर माफीनाम्याची पोस्ट त्याच्याकडून पोलिसांनी टाकून घेतली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोशल मीडियावर बसक्या डॉन या गुंडाने तलवारीने केक कापल्याची रिल व्हायरल झाली होता. सायबर पेट्रोलिंगमध्ये रिल बघताच गुंडाविरोधी पथकाने संशयित भाईचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखवताच त्याने सोशल मीडियावर माफी मागत यापुढे कधीच अशा रिल बनवणार नसल्याची लेखी हमी दिली.
संशयितासह वाढदिवसाच्या रिलमध्ये दिसणाऱ्या त्याच्या पाच समर्थकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. सोशल मीडियावर वादग्रस्त रिल्स, पोस्ट वर सायबर पेट्रोलिंगद्वारे नजर ठेवली जात असून वादग्रस्त रिल व्हायरल करणे, लाइक, कमेंट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याने सायबर पोलिसांनी सांगितले.