मुंबई (प्रतिनिधी): राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप आणखी चिघळला आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक निष्फळ झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कृती समितीनं हा संप सुरुच ठेवण्याचा निर्धार कृती समितीनं व्यक्त केला आहे.
ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी संप मागे घेण्याची विनंती उदय सामंत यांनी घेतली होती. मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघू शकला नाही.
मुख्यमंत्री तोडगा काढणार का?:
उद्या (बुधवार, 4 सप्टेंबर) संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री या संपाबाबत काय भूमिका घेणार? मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संपावर तोडगा निघणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, गोपिचंद पडाळकर आणि सदाभाऊ खोत या सत्ताधारी आमदारांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे. या नेत्यांच्या संघटना देखील संपात उतरणार आहेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचा इशारा:
आज रात्री पगारवाढीची घोषणा झाली नाही तर आज रात्रीपासून राज्यभरातील सर्व एस टी कर्मचारी संपावर जातील, असा इशारा सत्ताधारी पक्षातील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते म्हणाले की, आम्ही सरकारी पक्षात असलो तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत. अधिकाऱ्यांना सुचना देऊनही ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत. आम्हांला कोणालाही अडचणीत आणायच नाही, आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही पण जर सुचना देऊनही महिनाभर का पगारवाढ झाली नाही?
काय आहेत एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्या?:
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे. कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत. घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी. 2015-2020 या कालावधीसाठी जाहीर केलेल्या रुपये 4849 कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी. सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5000 रुपयांची वाढ करावी. आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून घ्याव्यात व स्वमालकीच्या एस.टी. बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच मनुष्य बळही उपलब्ध करून द्यावे.