नाशिक: ६६ महिन्यांत दामदुप्पटची योजना; ठेवीदारांना घातला दीड कोटींचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): जादा व्याजदार, परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह अनेक ठेवीदारांना राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., च्या काठेगल्ली शाखेच्या संचालक व व्यवस्थापकासह पदाधिकाऱ्यांनी दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टिस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची काठेगल्ली येथे शाखा होती. तेथे फिर्यादी प्रदीप मधुकर वाघ (४९, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांच्यासह अन्य ठेवीदारांनी गुंतवणूक केली होती. या फसवणूकप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात वाघ यांनी फिर्याद दिली आहे. एप्रिल २०२३ सालापासून काठेगल्ली येथील बनकर चौकातील श्रीकृष्ण अव्हेन्यू इमारतीतील बँकेच्या शाखेत संशयित मुख्य संचालक मंडळ, शाखा व्यवस्थापक अशोक मुंदडा, सल्लागार प्रतिनिधी संतोष मुंदडा, उमेश मुंदडा, सल्लागार समितीतील संस्थेचे प्रतिनिधी आदींनी गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाघ यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना चालू खाते, स्मार्ट बचत खात्यावर ६ टक्के व्याज, एक लाख रुपयांचा बॅलन्स असल्यास ८ टक्के, आरडीवर १२ टक्के, १३ महिन्यांच्या ठेवीवर १ लाख रुपयांना १ हजाराच्या पटीत मासिक व्याज, ६६ महिन्यांत गुंतवणूकीचा दुप्पट परतावा अशा विविध योजना सांगितल्या. त्यामुळे गुंतवणूकदारांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी या सोसायटीत रक्कम गुंतविली.

संशयितांनी ठरल्याप्रमाणे काहीजणांना परतावा दिला, मात्र कालांतराने पैसे दिले नाही. वारंवार मागणी करूनही पैसे मिळाले नाही. गुंतवणूकदारांकडील १ कोटी ५१ लाख ६७ हजार ८५३ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास भद्रकाली पोलिस करत आहेत. (भद्रकाली पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८१/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790