नाशिक: अट्टल तिघा चेन स्नॅचर्सला पाच वर्षांची शिक्षा; विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल

प्रत्येकी तब्बल १५ लाख रुपयांचा ठोठावला दंड

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सात तर ग्रामीणमधील दोन अशा नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संघटितपणे कट रचून पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पोबारा करणाऱ्या तिघांना अट्टल सोनसाखळी चोरांना विशेष मोक्का न्यायालयाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) पाच वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १५ लाख ७५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सोमनाथ हिरामण बर्वे (३०, रा. चांदशी), नितीन जिवाजी पारधे (२५, रा. फुलेनगर, पंचवटी), अनिल भावराव पवार (२५, रा. सिद्ध पिंप्री), अशी आरोपींची नावे आहेत.

आडगाव पोलिस ठाणे हद्दीत २०१९साली एका लॉन्सबाहेर महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी स्वाती विजय परमेश्वरे (३३, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस करत असताना आरोपी सोमनाथ, नितीन व अनिल या तिघांनी मिळून यापूर्वी गंगापूर, आडगाव, पंचवटी, सरकारवाडा, अंबड, सातपूर या शहरी भागांतून तसेच ओझर, दिंडोरी व नाशिक तालुका या ग्रामीण भागातसुद्धा अशाप्रकारे संघटितपणे महिलांच्या सोनसाखळ्या लंपास केल्याचे उघडकीस आले होते.

हे तीनही आरोपी मागील दहा वर्षांच्या कालावधीत किमान तीन वर्षे शिक्षेस पात्र असलेले विविध स्वरूपाचे गुन्हे संघटितपणे करत होते. यानुसार आडगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा व जबरी चोरीप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल होता.

तत्कालीन उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख, उपनिरीक्षक पी. बी. पालकर, हवालदार शरद सोनवणे यांनी सखोल तपास करत सबळ पुरावे न्यायालयात सादर केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जिवणे यांच्या न्यायालयात सुरु होती. सरकारपक्षाकडून अभियोक्ता डॉ. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला.

दंड न भरल्यास १ महिन्याचा कारावास:
तीनही आरोपींना प्रत्येकी १५ लाख २५ हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. यानुसार प्रत्येकाला हा दंड भरावा लागणार आहे. दंड न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावास वाढीव स्वरूपात भोगावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790