नाशिक: पंचवटी परिसरात तीन ठिकाणी घरफोड्या करणाऱ्यांना ५ वर्षांचा कारावास !

महिनाभरात फैसला; जलदगतीने खटला !

नाशिक (प्रतिनिधी): चालू वर्षी मार्च महिन्यात पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यात पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी जलदगतीने हा खटला चालवून अवघ्या महिनाभरात निकाल दिला. अट्टल घरफोड्या आरोपी अस्लम आतिक शेख (२६, रा. भिवंडी) व पोपट शंकर कणिंगध्वज (३२, रा. पारनेर) यांना पाच वर्षांचा कारावास व दंडाची शिक्षा शनिवारी (दि.३१) सुनावली.

पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ मार्च २०२४ साली फिर्यादी दीपाली शेजवळ (३०, रा.आई अपार्टमेंट, कर्णनगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून १ लाख २४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरांनी गायब केला होता. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत तारवालानगर येथे फिर्यादी प्रशांत ठाकरे यांचा बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. तिसरी घटना २१ मार्च रोजी अमृतधाम भागात घडली होती. या गुन्ह्यात फिर्यादी सचिन घुले यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ३ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला होता. या तीनही घरफोड्यांप्रकरणी पोलिसांनी अस्लम शेख व त्याच्याकडून चोरीचा माल घेणारा पोपट कर्णिगध्वज यास अटक केली होती. हे दोघेही

न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात होते. याप्रकरणी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात अवघ्या महिनाभरापूर्वी खटला सुरू झाला होता. सरकार पक्षाकडून अभियोक्ता सुनीता चिताळकर यांनी युक्तिवाद केला. तत्कालीन पोलिस हवालदार ए.बी. गुंबाडे, एम.टी. नांदुर्डीकर, दीपक नाईक यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले. याप्रकरणी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे न्यायालयाने या दोघांना दोषी धरले. पाच वर्षांचा कारावास आणि अस्लम यास ३० हजार, तर पोपट यास १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790