नाशिक: ‘त्या’ महिलेचा खूनच ! पती पसार…

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा परिसरात बंद फ्लॅटमध्ये गुरुवारी (ता. २९) विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानुसार तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तर तिचा पती गेल्या तीन दिवसापासून पसार असल्याने त्याच्यावरच संशयाची सुई आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातलग आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे.

निशा मयुर नागरे (३३, रा. कृष्णा प्राईड अपार्टमेंट, सदाशिवनगर, पाथर्डी शिवार, इंदिरानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी संशयित पती मयूर नागरे याच्यावर संशय व्यक्त केला असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

निशाचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. संशयित मयूरच्या अटकेनंतरच खुनाचे नेमके कारण समाेर येणार आहे. इंदिरानगर पोलिसांच्या माहितीनुसार, निशा ही मुंबईतील हॉटेलमध्ये कामास होती. तर तिचा पती मयूर नागरे याची कोणार्कनगर येथे चहाची फ्रॅन्चायसी असल्याचे समाेर आले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

बुधवारी (ता.२८) दुपारी नागरे यांच्याकडे घरकामास असलेल्या मोलकरीणीने घरी कामास गेली असता निशा व मयूर यांनी, आम्हाला हॉटेलला जायचे आहे. तुम्ही काम लवकर आवरा, असे सांगितले. त्यानुसार संगिता काम आवरून घरी परतल्या. त्यानंतर गुरुवारी (ता. २९) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या कामासाठी गेल्या. त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडला असता बेडवर निशा निपचीत पडल्याचे आढळून आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते दाखल झाले.

फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले असता निशाच्या मानेवर, गळ्यावर व अन्य शरीरावर गंभीर इजा असल्याचे समाेर आले आहे. सहायक निरीक्षक सुनील अंकाेलीकर हे तपास करीत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

ठोस माहिती मिळेना: मयत निशा व तिचा पती मयुर यांची ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. घरातील कागदपत्रे संशयिताने नेले असावे असा अंदाज आहे. तर दोघांकडील नातलगांचीही माहिती मिळत नसल्याने मयत निशा यांचा मृतदेह तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातच आहे. संशयिताच्या अटकेनंतर गुन्ह्याची उकल होणार असल्याने पोलिस कसून तपास करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here