नाशिक (प्रतिनिधी): राणेनगर, सिडकोला जोडणाऱ्या बोगद्याजवळ वाहतुकीचा नियमित होणारा खोळंबा टाळण्यासाठी गुरुवारी (दि. २९) या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यासाठी गर्डर लावण्यात आला. दुपारी या कामाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत गर्डर लावण्याचे काम सुरू होते.
राणेनगर, सिडको अंडरपास येथे दिवसभर तासनतास वाहतूक ठप्प होतअसल्याने याच्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून इंदिरानगर येथील बोगद्याप्रमाणेच राणेनगर अंडरपासला गर्डर लावून वाहतूक खोळंब्याची समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी वाहनधारकांच्या वतीने माजी नगरसेवक अमोल जाधव, सुदाम डेमसे, भगवान दोंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी बाळासाहेब साळुंखे यांना निवेदनाद्वारे ठप्प होणारी वाहतूक मार्गी लावण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार पाथर्डी फाटा येथील वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक देवीदास वांजळे यांनी साळुंखे यांच्याशी सखोल चर्चा करून ठप्प होणारी वाहतूक सुरळीत मार्गी लावण्यासाठी गर्डर टाकण्या आधी लहान-मोठ्या वाहनधारकांची व वाहतूक पोलिसांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्व स्तरातून वाहनधारकांनी स्वागत केले आहे.
वाहतूक ठप्प होण्याची समस्या सुटणार:
राणेनगर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी अंडरपासवर गर्डल लावण्यात आला आहे. यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंद झाला असून वाहतूक ठप्प होण्याची समस्या कायमची दूर होणार आहे. – बाळासाहेब साळुंखे, अधिकारी, महामार्ग प्राधिकरण