नाशिक (प्रतिनिधी): एका सेवानिवृत्त अभियंत्याला गॅस कनेक्शन बंद झाल्याचे सांगत त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर हॅकरने मोबाइल हॅक करत वापरकर्त्याच्या सोशल मीडियावर अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवत बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि मनपातील सेवानिवृत्त अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, ते गंगापूररोड येथे वास्तव्यास आहेत. अनोळखी नंबरवरून फोन आला. एमएनजीएल गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत लिंक पाठवली. अभियंत्याने लिंक ओपन केल्यानंतर संशयित हॅकरने मोबाइलचा ताबा घेतला. मात्र, ही फसवणूक असल्याचे समजताच अभियंत्याने फोनचे इंटरनेट बंद केले. फसवणूक टळल्याने हॅकरचा संताप झाला. त्याने मोबाइलचा ताबा घेत मोबाइलमधील कॉन्टॅक्ट, ग्रुपवर अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले.
काही मित्रांनी, नातेवाइकांनी फोन करून सांगितल्यानंतर अभियंत्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाइलचा अॅक्सेस रद्द करत तो परत मिळवून दिला. यानंतर अभियंत्याने सर्वांना मेसेज पाठवत दिलगिरी व्यक्त केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख तपास करत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790