नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह उपनगरांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे आता जीवघेणे ठरू लागले आहेत. भगूरमधील हेल्मेटधारी दुचाकीस्वाराचा अशाच खड्ड्याने बळी घेतल्याने खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 44 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या भगूर परिसरात घडली आहे. अमित गाढवे असे मयताचे नाव आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने एका इसमाला जीव गमवावा लागला. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून भगूर नगरपरिषद या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि. 24 रोजी वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्स जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा करण्यात आला होता. मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता.
रविवारी सायंकाळी पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यात पाणी साचले होते. यावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून जात असलेल्या 44 वर्षीय अमित रामदास गाढवे हे त्या खड्ड्यात पडले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ कॅन्टोन्मेंट, तसेच जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले. घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.
संबंधितांवर कडक कारवाई करावी:
पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने अमित गाढवे यांना आपला जीव गमवावा लागला. भगूर नगरपरिषद या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काम झाल्यावर खड्डा न बजावणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, अमित रामदास गाढवे हे नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात तो कामाला होते. त्यांच्या पश्चात आई- वडील पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.