नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लग्न झाल्यानंतर पतीसोबत दुबईला पाठवू, असे सांगून प्रत्यक्षात न पतीबरोबर न पाठविता उलट घर घेण्यासाठी माहेरून दोन कोटी रुपये आणले नाहीत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहितेच्या आई-वडिलांना भेटून पतीसह सासरच्या इतर १४ नातेवाईकांनी संगनमत करून मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला पतीसोबत दुबईला पाठवू, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला, तसेच लग्नानंतर विवाहितेला पतीबरोबर दुबईला न पाठविता तिची फसवणूक केली. त्यानंतर हैदराबाद येथे घर घेण्यासाठी दोन कोटी रुपये व सोन्याचे दागिने घेऊन येण्यास विवाहितेला सांगितले.
मात्र विवाहितेने पैसे व सोन्याचे दागिने आणले नाहीत या कारणावरून कुरापत काढून पतीसह सासरच्या पाच महिला व नऊ पुरुषांनी विवाहितेला शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली, तसेच तिच्या अंगावरील दहा तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन त्याचा अपहार केला आणि विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढून दिले.
हा प्रकार दि. २४ जुलै ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत जुने सिडको येथील राहत्या घरी व सासरी घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच महिला व नऊ पुरुष अशा १४ जणांविरुद्ध विवाहितेची छळवणूक व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.