नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून तब्बल सहा कोटींची फसवणूक प्रकरणी एका संशयिताच्या कोलकत्त्यात मुसक्या आवळल्या आहेत. शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा माग काढत झारखंड व नंतर कोलकत्ता गाठले होते. नाशिक न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.९) पोलीस कोठडी सुनावली आहे.
अभयकुमार विनोदकुमार सत्पथी (३६, रा. आदित्यपुर, सराईकेला, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे. गेल्या जून महिन्यात रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उपनगर हद्दीतील युवकाला ८ लाखांना गंडा घातला होता.
पोलीस तपासामध्ये संशयितांच्या टोळीने ६२ जणांना अशारितीने आमिष दाखवून तब्बल ६ कोटी २ लाख ३२ हजारांना गंडा घातल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किशोर कोल्हे करीत होते.
पथक झारखंडमार्गे कोलकत्ता:
आर्थिक गुन्हेशाखेच्या तपासात रमण सिंग उर्फ विशाल सिंग (रा. कोलकत्ता), निरज सिंग (रा. टाटानगर, झारखंड), ऋतुराज पाटील उर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. सांगली), राजेश सिंग (रा. कोलकत्ता), अंशुमन प्रसाद (रा. रांची, झारखंड), संदीप सिंग (रा रांची), जैन अली (रा. वाशी, नवी मुंबई) या संशयितांची नावे निष्पन्न झाली होती. पथकाचे सहायक निरीक्षक किशोर कोल्हे, हवालदार नितीन कराड, प्रविण महाजन, सचिन आभाळे हे संशयित अभयकुमार सत्पथी याच्या मागावर गेल्या आठवड्यात झारखंडमधील सिनी, जमशेदपूर (झारखंड) येथे पोहोचले. त्यावेळी संशयित अभयकुमार सत्पथी हा कोलकाता येथे असल्याचे समजले. त्यामुळे पथकाने कोलकाता गाठून शिताफीने सत्पथीला ताब्यात घेतले.
सहा कोटी मौजमजेत:
संशयित सत्पथी याने काेलकाता व झारखंड येथे रेल्वेकडून एका रेल्वे स्थानकावर ‘टिकिटघर’ मिळविले आहे. मात्र, इतरांना चालविण्यास दिले. यातून संशयितांची टोळी तयार होऊन त्यांनी संगतमताने रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून ठकबाजी सुरू केली.
सत्पथी याच्यावर झारखंड पोलिसांतही गुन्हा दाखल असून, याप्रकरणी दोघांना अटक केलेली आहे. त्यांचाही ताबा लवकरच नाशिक पोलीस घेणार आहे. तसेच, संशयितांच्या टोळीने उकळलेले ६ कोटींची रक्कम मौजमजेत उडविल्याचे तपासात समोर आले आहे.
असा आहे प्रकार:
विरेश राजेश वाबळे (रा. लोखंडेमळा, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित रमन सिंग याने वाबळे यांच्या पत्नीला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. वाबळे यांच्याकडून ८ लाख रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी श्रीमती वाबळे यांना प्रशिक्षणासाठी कोलकाता येथे बोलावून घेत रेल्वेचे खोटे नियुक्तीपत्र दिले. कोलकत्त्यात एका ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नेमले. त्यानंतर महाराष्ट्रात बदलीसाठी पुन्हा वाबळे यांच्याकडून पैसे घेतले. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत त्यांची तब्बल ११ लाखांची फसवणूक झाली होती. अशारितीने संशयितांच्या टोळीने ६२ जणांची सुमारे ६ कोटी २ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी १४ जून रोजी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
“रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्यास अशा तक्रारदारांनी नाशिक शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे संपर्क साधावा आणि तक्रार द्यावी.”- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त,शहर गुन्हेशाखा