नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राका कॉलनीतून पायी जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना टेम्पोचालकाने कट मारला. त्यावरून विद्यार्थ्याने हळू चालवा असे म्हटल्याचा राग येऊन संशयित टेम्पोतील दोघांनी त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात विट मारून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.
तन्मय शेवाळे असे गंभीर जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. निखील तुषार खैरनार (वय: १७, रा. मानकर सदन होस्टेल, राका कॉलनी, मूळ राहणार: गिरणारे, ता. देवळा) याच्या फिर्यादीनुसार, निखिल व आतेभाऊ तन्मय दिलीप शेवाळे, दर्शन नितीन शेवाळे व साई प्रभाकर शेवाळे हे बारावीचे विद्यार्थी असून, सोमवारी (ता. ५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नर येथून जेवण करून हॉस्टेलकडे पायी जात होते.
सोनी पैठणीकडून जात असताना, छोटा हत्ती (टेम्पो) चालकाने तो भरधाव वेगात चालवून आणून पायी जाणाऱ्या या चौघांच्या अंगावर नेला. त्यावेळी निखील याने चालकाला “दादा जरा हळू चालवा” असे म्हणाला. संशयित टेम्पो चालकासह त्याच्या जोडीदारास त्याचा राग आला आणि त्याने निखीलसह तन्मय शेवाळे यांना मारहाण सुरू केली. त्यावेळी संशयितांनी तन्मयच्या डोक्यात वीट मारून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात तन्मय गंभीर जखमी झाला. त्यानंतर संशयितांनी टेम्पोसह घटनास्थळावरून पोबारा केला.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २०८/२०२४) तर, गंभीर जखमी तन्मय याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर आहे.
“संशयितांच्या टेम्पोचा शोध लागला असून संशयित दोघे पसार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक केले जाईल.”- सुरेश आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा