नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहराच्या मध्यवस्तीतील राका कॉलनीमध्ये मंगळवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे. हा फ्लॅट माजी नगरसेविकेचा असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून, त्यावरून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, राका कॉलनीतील नवकार रेसीडेन्सी या अपार्टमेंटमध्ये माजी नगरसेविका डॉ. ममता पाटील या राहतात. मंगळवारी (ता.६) पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटबाहेर असलेले ग्रील आणि मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करीत हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड, असा सुमारे ५७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
यात ३२ लाख रुपये किमतीचे १६ नग सोन्याचे मणी मंगळसूत्र, १२ लाख रुपये किमतीचे ६ नग हिरे व सोने मिश्रित मंगळसूत्र, ३ लाख रुपये किमतीचे १५ जोडी सोन्याची कर्णफुले, १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे हिरे-सोने मिश्रित कर्णफुले, २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे घड्याळ, १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ४ सोन्याच्या अंगठ्या, ३ लाख रुपये किमतीचे ३ सोन्याचे नेकलेस आणि १८०० अमेरिकन डॉलर या ऐवजाचा समावेश आहे.
मंगळवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त मोनिका राऊत, गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात डॉ. शैलेंद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. ममता पाटील यांच्या फ्लॅटबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. संशयित चोरट्यांनी फ्लॅटबाहेरील संरक्षण ग्रील आणि नंतर मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि ऐवज चोरला. मात्र जाताना त्यांनी सीसीटीव्हीची डिव्हीआरही चोरून नेला. परंतु डॉ. पाटील यांच्या समोरील फ्लॅट बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डोक्यात टोपी आणि चेहऱ्यावर मास्क, हातात लांब सळई व पाठीवर सॅक असलेला संशयित कैद झाला आहे.