नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दीपअमावस्येच्या अनुषंगाने शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रविवारी (ता. ५) रात्री शहरात पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदी करीत ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जात होती. त्यावेळी अमृतधाम चौकात आरडाओरडा करणाऱ्या संशयिताने नाकाबंदीच्या ठिकाणी असलेल्या पोलीस अंमलदाराला शिवीगाळ करीत झटापट केली.
याप्रकरणी संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश रमेश गिरी (३०, रा. अश्वमेधनगर, आरटीओ कॉर्नरजवळ, पंचवटी) अस संशयिताचे नाव आहे. पोलीस हवालदार चंपालाल मगन सुळे यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.४) रात्री दीप अमावस्ये(गटारी) अनुषंगाने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात पोलीस ठाणेनिहाय फिक्स पॉईंट नाकाबंदी लावण्यात आलेली होती. हवालदार सुळे हे अमृतधाम चौक येथील फिक्स नाकाबंदीसाठी नियुक्त होते.
रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित आकाश गिरी हा अमृतधाम चौकात आरडाओरडा करीत परिसरातील सार्वजनिक ठिकाणी अशांतता पसरवित होता. त्यावेळी हवालदार सुळे यांनी त्यास हटकले असता, संशयिताने त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्याशी झटापट केली. यात हवालदार सुळे यांच्या शर्टाच्या बटन तुटले. संशयिताने सरकारी कामात अडथळा आल्याने त्याच्याविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत. (आडगाव पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २२०/२०२४)