नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): हिरावाडीत पायी जाणाऱ्या महिलेस दोघा संशयितांनी पोलिस असल्याची बतावणी करून त्यांचे ७५ हजारांचे सोने हातचलाखीने लंपास करीत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७८ वर्षीय वृद्धा हिराबाई कृष्णा जाधव (रा. स्नेहधारा अपार्टमेंट, हिरावाडी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. २) सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या ओमनगरमधील महावीर बंगल्यासमोरून पायी जात होत्या.
त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांनी आवाज देऊन थांबविले. त्यावेळी संशयिताने आम्ही पोलिस आहोत. अंगावर एवढे सोने घालून का फिरता असे म्हणून ते त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने स्वत:कडे घेत, त्या बांगड्या पिशवीमधये ठेवत असल्याचे भासवून हातचलाखीने ७५ हजारांच्या दोन बांगड्या भामट्यांनी हातोहात लंपास करीत त्यांना फसविले.
घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले असता पिशवीत बांगड्या नसल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक कैलास जाधव हे तपास करीत आहेत.