नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वेबसाईटच्या माध्यमातून ओळख निर्माण करून घटस्फोटित महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका परप्रांतीयासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही नाशिकमध्ये राहते. दरम्यान, संशयित आरोपी विपुल नरसीभाई सवानी (रा. सुरत, गुजरात, ह. मु. जुने पनवेल) हाही घटस्फोटित असून, त्याने पीडित महिलेशी सन २०२० मध्ये एका वेबसाईटच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एकमेकांशी संपर्क सुरू होऊन रोज बोलणे होऊ लागले. त्यानंतर संशयित आरोपी विपुल सवानी याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध तिला नाशिकमधील एका हॉटेलमध्ये तसेच जुने पनवेल, नवी मुंबई येथे नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. त्याचप्रमाणे आरोपी सवानी याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्याकडून कार घेण्यासाठी, फ्लॅटसाठी, तसेच औषधोपचाराचा बहाणा करून पीडित महिलेकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली, तसेच हे पैसे त्याने बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून पीडित महिलेने वेळोवेळी हे पैसे त्याला दिले, तसेच काही दिवसांनी आरोपी सवानी याने जागा खरेदी-विक्रीच्या निमित्ताने आणखी काही रोकड उकळली.
दरम्यान, बऱ्याच पीडितेने लग्नाबाबत विचारले असता आरोपी विपुल सवानी याने तिच्यासोबत लग्नास नकार देऊन तिच्यासह तिच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच सवानीचे नातेवाईक वनिता कुकाडिया, चिराग सवानी व त्याचा मित्र देवांग दवे (सर्व रा. नवी मुंबई) यांनी पीडितेला दमबाजी केली, तसेच चारही आरोपींनी पीडितेकडून ९७ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम घेऊन तिचा अपहार करून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सन २०२० ते दि. २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला, असे पीडितेने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत. (इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १९४/२०२४)
![]()

