नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अघोरी विद्या करण्यासाठी मानवी कवट्या गळ्यात घालून नागरिकांमध्ये भीती निर्माण करत जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबाला अटक करण्यात आली.
पंचवटी पोलिस ठाण्याच्या पथकाने एरंडवाडी येथे ही कारवाई केली. नीलेश राजेंद्र थोरात (३८) असे भोंदूचे नाव आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी पथकाचे कैलास शिंदे यांना एरंडवाडीत नीलेश थोरात हा जादूटोणा करण्याकरिता मानवी कवट्या गळ्यात टाकून अघोरी विद्या करुन लोकांना जादूटोणा भूतपिशाच्च प्रयोग करीत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने एरंडवाडी येथे संशयित भोंदूच्या घरी छापा टाकत घरात मानवी कवट्या आणि कवट्यांची माळ त्याला शेंदूर, कुंकू लावलेल्या दहा ते पंधरा मानवी कवट्या मिळून आल्या. संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करुन लोकांना तथाकथीत चमत्कार दाखवत त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करतो अशी कबूली दिली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
म्हणे माझ्याकडे अलौकिक शक्ती आहे…
भोंदूगिरी करणाऱ्या नीलेश याने मी गळ्यात कवट्यांची माळ टाकून मला अलौकिक शक्ती प्राप्त आहे, असे लोकांना भासवून अघोरी प्रकार करत फसवणूक करत होता. भोळ्याभाबड्या नागरिकांना काहीतरी चमत्कारिक प्रयोग दाखवत असल्याचे भासवून स्वतःचा आर्थिक फायदा करून नीलेश हा करत असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.