नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार तसेच अभिजात संगीताची जपणूक करण्यासाठी, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे १७ जूनपासून ‘स्वर सावाना’ हा नवीन उपक्रम सुरू होत आहे.

शहरातील तसेच राज्यातील शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नवोदित कलावंतांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हा कार्यक्रम होईल.
सावाना सभासद आणि रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. या उपक्रमाचा प्रारंभ १७ जून रोजी सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके आणि शरयू देशमुख यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होईल. त्यात ‘वसंताभिषेक’ या कार्यक्रमात पं. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या निवडक संगीत रचना पुणे येथील पं. शौनक अभिषेकी यांचे शिष्य विश्वजीत मेस्त्री आणि नाशिकचे पं. शंकरराव वैरागकर यांचे शिष्य सागर कुलकर्णी सादर करतील. त्यात नाट्यसंगीत, अभंग, भावगीत, ठुमरी हे प्रकार सादर होणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य. विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष अॅड.अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सहा. सचिव जयेश बर्वे, अर्थसचिव गिरीश नातू, ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, वस्तुसंग्रहालय सचिव सौ. प्रेरणा बेळे, डॉ.धर्माजी बोडके, प्रा.सोमनाथ मुठाळ, मंगेश मालपाठक, सांस्कृतिक सहसचिव प्रशांत जुन्नरे, उदयकुमार मुंगी, अॅड.भानुदास शौचे यांनी केले आहे.