नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): विना तारण, विना सीबील स्कोर, विना जामीनदारांशिवाय कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून ‘हाक मराठी अर्बन निधी’ बँकेच्या कथित संचालक मंडळासह व्यवस्थापनाने २०४ जणांकडून ३४ लाख १६ हजार रुपये उकळले आहेत.
याप्रकरणी एका संशयितास आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली असून, अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण सुरेश वाघ, वर्षा हिराचंद्र पाटील, मेघा योगेश बागुल, मनिषा सुरेश पाटील, अमित अनंत बने, सुरेश विनायक पाटील, व्यवस्थापक चंद्रशेखर लक्ष्मण कडू, एकनाथ निवृत्ती पाटील, योगेश गुलाब पाटील आणि बँकेतील अधिकारी- कर्मचार्यांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. संशयित योगेश गुलाब पाटील यास अटक करण्यात आली आहे.
संशयित भूषण वाघ याने सन २०२२ ते मे २०२४ या कालावधीत सिडकोतील उत्तमनगर बसस्टॉप जवळ ‘हाक मराठी अर्बन निधी’ बँक सुरु केली. बँकेतील संशयित संचालक मंडळ, व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांनी संगनमताने बँकेचा नफा वाढविण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या. त्यानुसार होमगार्ड असलेले सोपान राजाराम शिंदे (रा. नाणेगाव, ता. जि. नाशिक) यांना मोबाईलवर ‘ही बँक विनातारण, विनासिबिल स्कोर, विना जामीनदार पाच लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर करते’, असा मेसेज आला होता. तसेच कर्जावर व्याजदरही कमी असून ४५ दिवसात प्रोसेस पूर्ण करुन लोन देते’, असेही त्या जाहिरातीत म्हटलेले होते. शिंदे यांनी संशयित वाघ याच्या मोबाईलवर संपर्क साधून लोनची प्रोसेस व त्यासाठी लागणारा खर्च याची माहिती घेतली होती.
सभासदत्वाचा फंडा:
शिंदे यांना पाच लाखांचे कर्ज पाहिजे होते. त्यासाठी त्यांना बँकेचे सभासदस्यत्व स्विकारावे लागेल, असे सांगण्यात आले. सभासद फी १५०० रुपये, कर्जाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी २ हजार रुपये, इन्शुरन्ससाठी ३ हजार रुपये, व्हेरिफिकेशन फी १ हजार रुपये असे साडेसात हजार रुपयांचा खर्च, त्यानंतर वाघ याने संशयित वर्षा पाटील यांचा ऑनलाइन क्यूआर कोड शिंदे यांच्या व्हाटसअपवर पाठवून पैसे पाठविण्यास सांगितले. हे पैसे व इतर दहा हजार असे १७ हजार ५०० रुपये पाठवून बँकेचे पासबुक, प्रोजेक्ट रिपोर्ट संशयिताने शिंदे यांना पाठवून कर्ज मंजूर झाल्याचे पत्र पाठविले परंतु प्रत्यक्षात कर्जाची रक्कम दिली नाही. तसेच, खर्चाची रक्कमही न देता त्यांची फसवणूक केली. अशीच फसवणूक सुमारे २०४ जणांची करीत ३४ लाख १६ हजारांना गंडा घातला आहे. (अंबड पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३७४/२०२४)
तक्रारी वाढण्याची शक्यता:
तक्रारदार शिंदे यांच्यासह २०४ नागरिकांची कर्ज मंजूरी प्रकरणात फसवणूक झाली आहे. येत्या काही दिवसांत तक्रादार व फसवणूकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक समाधान चव्हाण हे तपास करत आहेत. पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरु असून आरबीआयचा बँक परवाना व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.