नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथे २४ डब्यांच्या गाड्या थांबण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या विस्तारा कामाकरिता घेतलेला ३६ तासांचा विशेष ब्लॉक रविवारी दुपारी नियोजित वेळेपूर्वीच संपला. त्यामुळे दोन दिवस विस्कळीत झालेली रेल्वे वाहूतक पूर्ववत झाली आहे. त्यामुळे सोमवारी (दि.३) पंचवटी, नंदीग्राम, तपोवन, राजधानीसह विविध गाड्या वेळेत धावणार आहेत.
मुंबईला दोन दिवस अडकलेली पंचवटी रविवारी रात्री नेहमीच्या वेळेला मनमाडला परतली. मेघा ब्लॉकमुळे शनिवारी आणि रविवारी सकाळी मुंबईला जाणारी राज्यराणी, पंचवटी, धुळे-मुंबई, कामाख्या या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
मुंबईहून सुटणारी तपोवन, जनशताब्दी, दादर धुळे, मुंबई-जालना वंदेभारत, मुंबई-हावडा दुरंतो या गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. नागपूरहून मुंबईला जाणारी सेवाग्राम नाशिकरोड पर्यंतच धावली. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता ती पुन्हा नागपूरला रवाना झाली.
नशताब्दी एक्स्प्रेस मुंबईला न जाता मनमाडला थांबून ती पुन्हा हिंगोलीला रवाना झाली. लांब पल्ल्याच्या निजामुद्दीन, गीतांजली, पुष्पक, नागपूर-सीएसएमटी हॉलिडे वाराणसी, महानगरी, आदिलाबाद नंदीग्राम, पंजाब मेल, अमृतसर आदी गाड्या आता पूर्ववत धावणार असल्याने नाशिक रोडला दोन दिवस मुक्काम ठोकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला.
शनिवार व रविवार पंचवटी रद्द असल्याने अनेकांनी मुंबई व ठाण्याला कामानिमित्त जाणे टाळले होते. मेघा ब्लॉक दुपारी संपल्यानंतर सायंकाळपासून रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी होऊ लागली होती.