नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाइन शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणे पाच गुंतवणूकदारांना महागात पडले. संशयितांना विविध कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याकरिता पैसे भरण्यास भाग पाडत १९ लाख ८३ हजारांचा गंडा घातला. सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि संतोष ढगे (रा. पारिजातनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये स्टॉक इन्व्हेस्टमेंट क्लबची मोबाइलवर लिंक आली. या लिंकला प्रतिसाद दिला असता संशयित आर. एन. रेड्डी, ग्रुप अॅडमिन नमिशा गुप्ता, नावाच्या इसमांनी शेअर्स मार्केटची लिंक पाठवली.
नामांकित कंपनीचे शेअर्स घेत ट्रेडिंग केल्यास जाता नफा मिळवून देण्याचे आमिष दिले. संशयितांनी सुरुवातीला काही शेअर्सचा जादा परतावा दिला. विश्वास बसल्याने ढगे यांच्यासह इतर पाच गुंतवणूकदारांनी वेळोवेळी संशयितांनी सांगितलेल्या बँक खात्यात
१९ लाख ८३ हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले. आठ महिने उलटूनही ट्रेडिंगमध्ये परतावा मिळत नसल्याने संबंधित नंबरवर संपर्क साधला असता संशयितांनी शेअर्स मार्केट पडल्याचे सांगत पैसे देण्यास नकार देत संपर्क तोडला. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, ऑनलाइन लिंक पाठवून शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जादा परताव्याचे आमिष देण्याचे प्रमाण वाढले आहे.