नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आयकर विभागाने नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर छापा टाकला, मालकाच्या कथित अज्ञात व्यवहाराच्या प्रत्युत्तरात. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पथकाने एकाचवेळी विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईसाठी तब्बल ३० तास लागले. आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली नागपूर आणि जळगाव येथील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली. रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तास लागले.
५० ते ५५ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. सुराणा ज्वेलर्स आणि त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात धाडी टाकण्यात आल्या. राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने कारवाई केली. छाप्यात सुरुवातीला कार्यालयांमध्ये तसेच खासगी व्हॉल्टच्या लॉकर्समध्ये रोकड हाती लागली. मात्र, आणखी रकमेचा शोध सुरु होता. याचवेळी संबंधितांच्या आलिशान बंगल्यात पथकाने तपासणी केली. मात्र अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी फर्निचर ठोकून बघितले. फर्निचरचे प्लायवूड काढल्यानंतर आतील कप्यात नोटांच्या थप्या भिंतीप्रमाणे रचलेल्या दिसून आल्या.
तसेच वरच्या मजल्यावरील त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापेसत्र सुरू केले. एकाचवेळेस त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. त्याचवेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले.
मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तऐवज पथकाने जप्त केले. दीड दिवसाच्या कारवाईत मालमत्तांचे दस्तावेज असलेले पेन ड्राइव्ह तसेच हार्डडिस्क जप्त करण्यात पथकाला यश आले. या धाडीमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.