मुंबई (प्रतिनिधी): दोन महिन्यांच्या मुलीची पाच लाखांत विक्री करणाऱ्या नाशिकच्या महिलेसह दोन एजंट आणि मुंब्रा येथील ९ संशयितांना अटक करण्यात आली. या मुलीचा जन्म दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला होता. मुलीच्या आईने एजंटमार्फत मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले.
मुंब्रा पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला पंधरा दिवसांपूर्वी माहिती मिळाली की मुंब्रा येथील संशयित सहिदा, साहिल व इतर सहकारी हे ८४ दिवस वय असलेल्या मुलीची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. पथकाने बनावट ग्राहक तयार केले. लंगडा नामक व्यक्तीला संबंधित एजंटला फोन करण्यास सांगितले. नाशिक मधून या मुलीची पाच लाखात विक्री करण्याची तयारी दर्शविण्यात आली.
पोलिसांनी पहाटे मुंब्रा रेती बंदर येथे सापळा रचला. संशयित दलाल साहिल ऊर्फ सद्दाम हुसेन मकबूल खान, साहिदा रफिक शेख, खतिजा सद्दाम खान (तिघे रा. अमृतनगर, मुंब्रा), दलाल प्रताप किशोरलाल केशवानी (रा. उल्हासनगर), मोना सुनील खेमाने (रा. टिटवाळा), दलाल सुनीता सर्जेराव बैसाणे, सर्जेराव बैसाणे (दोघे रा. पांडवनगरी, इंदिरानगर) यांना दोन महिन्यांच्या बाळासह ताब्यात घेतले.
जिल्हा रुग्णालयात मुलीचा जन्म:
शालू कैफ या महिलेने दि. २९ फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यासंदर्भातील एमसीपी कार्ड, माता बालसंरक्षक कार्ड आणि रुग्णालयातून घरी सोडल्याची कागदपत्रे पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली आहेत
चौकशीत बाळाची आई शालू कैफ शेख (रा. हॅप्पी होम कॉलनी), तृतीयपंथीय राजू मनोहर वाघमारे (रा. पंडित जवाहरनगर, मातंगवाडा, नाशिक) या दलालास नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. पथकाचे चेतना चौधरी, प्रीती चव्हाण, एन. डी. क्षीरसागर, श्रद्धा कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता:
नवजात अर्भकांसह मुलांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. मुंब्रा आणि नाशिक पोलिसांकडून संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. टोळीने आजपर्यंत किती मुलांची विक्री केली याचा तपास पथकांकडून सुरू आहे.