दहशतवादविरोधी पथकाची कारवाई, शिक्के, सातबारा, कागदपत्रेही जप्त
नाशिक (प्रतिनिधी): लॉज, हॉटेल्सच्या तपासणीत एका लॉजमध्ये ७ जणांची चौकशी केल्यानंतर संशयितांकडे महसूलचे बोगस शिक्के, सातबारा उतारे आणि बनावट आधार, पॅनकार्डसह अन्य बनवाट कागदपत्र सापडली. सातही जणांच्या चौकशीनंतर राज्यातील विविध न्यायालयात आरोपींना बोगस जामीन मिळवून देत असल्याचे उघड झाले. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे संदीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल्स, लॉजची तपासणी करताना रेल्वेस्थानकाजवळ एका लॉजच्या रुममध्ये ७ जण संशयास्पद अढळले. त्यांच्या संशय आल्याने बॅगांची तपासणी केली असता त्यात बनावट रेशनकार्ड, महसूल विभागाचे बनावट शिक्के, अवदेश नारायण रामधर उपाध्याय याच्याकडे स्वतःच्या नावाचे फोटो असलेले वेगवेगळ्या क्रमांकाचे तीन आधारकार्ड सापडले. संशयित नितीन महाले, अरुण गरुड, सचिन शिरसाठ, राकेश जाधव, प्रमोद नार्वेकर, देवीदास गायकवाड ही टोळी विविध गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात बोगस जामीन देत न्यायालयाची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले.
काही वकिलांचीही नावे समोर येण्याची शक्यता:
पोलिसांनी यासंदर्भात न्यायालयास पत्र दिले आहे. संशयितांकडे सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे ते कुठल्या आरोपींनी जामीन राहिले याची माहिती आता पोलिस घेणार आहेत. टोळी सराईत गुन्हेगारांना बोगस कागदपत्राच्या अधारे बोगस जामीनदार राहून राज्यातील न्यायालयात फसवणूक करत असल्याची शक्यता आहे. काही वकिलांची नावेही समोर येण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.