सध्या लग्नमुहूर्त नसल्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांवरही परिणाम
नाशिक (प्रतिनिधी): शाळा-महाविद्यालयांना असलेल्या सुट्ट्या तसेच लग्नमुहूर्तासाठी अस्त असल्याने सिटी लिंकच्या प्रवासी संख्येत घट झाल्यामुळे ३० बसेसच्या १०२ फेऱ्या कमी करण्यात आलेल्या आहे.
दरम्यान, आगामी काळात प्रवासी संख्या वाढल्यास सेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती सिटी लिंकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सिटी लिंकद्वारे रोज ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवास करतात.
मात्र, सध्या सुट्ट्या असल्याने विद्यार्थी प्रवासी संख्या कमी झाली आहे तर गुरू अस्त असल्यामुळे दीड-दोन महिने लग्नाचे मुहूर्त नाहीत. परिणामी ग्रामीण भागात जाणारी प्रवासी संख्यादेखील कमी झाली आहे. त्यामुळे २५० बसपैकी सिटी लिंक ३० बसेसच्या १०२ फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीला २४०० फेऱ्या होत आहेत. फेऱ्या कमी केल्याने अधीच तोट्यात असलेल्या सिटी लिंकच्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे.