दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील उच्चभ्रु वसाहत असलेल्या सिरीन मेडोज परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत खेचून नेणाऱ्या दोघा सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोपेडसह चोरीचे सोने असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
योगेश शंकर लोंढे (रा. खळवाडी, ता. सिन्नर), दत्तू उत्तम धुमाळ (रा. जोशी वाडा, गंगापूर रोड) असे दोघा संशयितांची नावे आहेत. भारती पुरुषोत्तम रावत (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) या १ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना संशयितांनी मोपेडवरून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यात संशयितांचा शोध घेत असताना, अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांना दोघा संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार चोपडा लॉन्स परिसरात सापळा रचून मोपेडवरील (एमएच १५ जीएल ०४३५) दोघांना शिताफीने जेरबंद केले.
चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीचे सोने त्यांनी काठेगल्लीतील सराफाला विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून १ लाखांच्या सोन्याची लगड व मोपेड असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयितांना तपासाकामी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, गजानन इंगळे, चेतन श्रीवंत, सुगन साबरे, शरद सोनवणे, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, किरण शिरसाठ यांच्या पथकाने सदर कामगिरी बजावली.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: म्हसरूळला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790