राजूर फाट्याजवळील घटना: चार मारेकरी हल्ला करून फरार
नाशिक (प्रतिनिधी): कुस्तीपटू भूषण दिनकर लहामगे (४०) यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी बंदुकीने फायर करून नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने भूषण यांचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना शुक्रवारी (दि. १०) दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिक-इगतपुरी महामार्गावरील विल्होळीनजीक राजूर फाटा येथे पंजाबी ढाब्याजवळ घडली. ऐन अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशीच खूनाची ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दोन मारेकरी दुचाकीवर आले होते. तर अन्य दोन मारेकरी घटनेच्या ठिकाणी दबा धरून बसले होते. घटनेनंतर दुचाकी (क्र.एम.एच.१५ इ.७६७४) सोडून मारेकरी पसार झाले. भूषण यांना रस्त्यात अडवून आधी त्याच्या पाठीवर दोन गोळ्या फायर करण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. भूषण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता.
आरोपींनी इगतपुरीच्या दिशेने पळ काढला. भूषण यांची हत्या का आणि कोणत्या कारणामुळे झाली, याचा उलगडा होऊ शकला नव्हता. वाडीवन्हे अन् ग्रामीण पोलिस घटनास्थळी हजर झाले. भूषण यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला. याठिकाणी भूषण यांचे नातेवाईक, गावातील नागरिक उपस्थित होते. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला.
आधी प्रतीक्षा केली, मग झाडल्या गोळ्या:
भूषण हे इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होते. ते शेती तसेच दुधाचा व्यवसाय करीत. म्हशींसाठी चक्कीतले पीठ घेऊन ते आपल्या गावी सांजेगाव येथे निघाला होते. सकाळपासून ते नाशिकमध्ये आले होते. काही बाजार करून व शहरातील सिडको येथील चक्कीतून म्हशींना पीठ घेऊन ते दुचाकीने जात होते. त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या संशयितांनी त्यांचा रस्ता अडवून खून केला. भूषण यांनी जिल्हा, विभाग स्तरावर कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली होती.