नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): थांब्यावर रिक्षा लावण्याच्या वादातून टोळक्याने एका रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हर्षल छबु विधाते (रा. आयटीआय कॉलनी,श्रमिकनगर) या रिक्षाचालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विधाते बुधवारी (दि.८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मेळा बसस्थानक येथील रिक्षा थांब्यावर आपली रिक्षा लावून प्रवाश्यांची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. महेश गांगुर्डे या रिक्षाचालकाशी ते गप्पा मारत असतांना एमएच १५ एफयू ०८३७ या रिक्षाच्या चालकाने तू येथे रिक्षा लावू नको अशी कुरापत काढून विधाते यांच्या कानशिलात वाजविली.
यानंतर विधाते यांनी काढता पाय घेतला असता संशयिताने आपल्या रिक्षातून पाठलाग केला. यावेळी त्याने साथीदारांना बोलावून घेत विधाते यांची रिक्षा धाडीवाल हॉस्पिटल भागात अडवून त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी रॅाडचा वापर करण्यात आल्याने विधाते जखमी झाले असून अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.