नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रिक्षा स्टॅन्डकडे पायी जाणाऱ्या व्यक्तीची लूट करून मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अफाक मुस्ताक अन्सारी (३२, रा.पिझार घाट), मिझान रजा शेख (१९, रा. बागवानपुरा), नवाज कलीम शेख (२१, रा. नाईकवाडी पुरा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.
द्वारका भागात विनोद शर्मा यांची लूट करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी (ता. ८) सकाळी साडेचारच्या सुमारास घडला. श्री. शर्मा त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी रिक्षा स्टॅन्डकडे जात होते. त्या वेळी दुचाकीवरून (एमएच- ४१- एच- ९०६७) तिघे संशयित त्यांच्याजवळ आले. कुठे जायचे अशी विचारणा करून त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला.
त्यांना धक्काबुक्की करत घटनास्थळावरून पळ काढला. त्यांनी पोलिसात तक्रार केली. शर्मा यांनी सांगितलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून भद्रकाली गुन्हे शोध पथक संशयितांचा शोध घेत होते. दरम्यान यातीलच दोन संशयित द्वारका भागात एकास मारहाण करत होते.
गुन्हे शोध पथकाचे कय्यूम सय्यद, अविनाश जुंद्रे यांना दोघे आढळून आले. मोबाईल चोरीच्या वर्णनातील दोघे असल्याची खात्री झाल्याने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, आशीष गांगुर्डे, कय्यूम सय्यद, अविनाश जुंद्रे नितीन भामरे, दया सोनावणे, नीलेश विखे, श्री. गवळी यांनी अधिक तपास करत अन्य एकास ताब्यात घेतले.